• Home
  • Event-Details

Event-Details

NSS Special Camps 2026

Place: Malvihir | Date: 2026-01-19


डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे  विशेष शिबिराचे माळविहीर येथे दिमाखात उद्घाटन....
समाजसेवेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो : प्राचार्य डॉ. आर. यू. वाघ
माळविहीर (ता. …) – येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ. रा. गो. कृषी महाविद्यालय, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विशेष शिबिराचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. या उद्घाटन समारंभाला ग्रामस्थ, मान्यवर, शिक्षकवृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. यु. वाघ विराजमान होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून माळविहीरचे ग्रामपंचायत सरपंच सौ. अर्चना दिलीप आडवे,  पोलीस पाटील सन्माननीय श्री. देविदास संपत आडवे, प्रमुख ग्रामस्थ माननीय श्री. हर्षल आडवे, तसेच माळविहीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. एस. एच. टेकाळे व शिक्षिका सौ. एस. टी. राऊत मॅडम यांची उपस्थिती लाभली.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. आर. यू. वाघ यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच समाजसेवेची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक असून राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना ग्रामीण वास्तवाशी जोडणारी प्रभावी चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, नेतृत्वगुण व सामाजिक बांधिलकी निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व सहाय्यक प्राध्यापक श्री. एस. एस. सरप यांनी शिबिराची सविस्तर प्रस्तावना मांडली. शिबिराच्या कालावधीत स्वच्छता अभियान, आरोग्यविषयक जनजागृती, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, सामाजिक प्रबोधन तसेच ग्रामविकासाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या माध्यमातून माळविहीर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असून या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव दृढ होऊन राष्ट्रसेवेची भावना अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रमास इंदिरामध्ये शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. योगेंद्रजी गोडे साहेब व सचिव मा. तन्वी योगेंद्र गोडे यांनी शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक शिवानी देशमुख व अंजली बैरागी यांनी प्रभावी व शिस्तबद्ध शैलीत केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्वयंसेवक पायल राजपूत या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले.
         उद्घाटन कार्यक्रमास डॉ. रा. गो. कृषी महाविद्यालय, बुलढाणा येथील प्राचार्य डॉ. आर. यू. वाघ, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व सहाय्यक प्राध्यापक श्री. एस. एस. सरप, जिमखाना प्रमुख डॉ. एम. एम. सोळंकी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक श्री. नितेश राठोड, डॉ. पी. ए. मुळे व एम. ए. ताठे हेही या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.